Deepak Somvanshi

श्री. दीपक सोमवंशी ,

खास पुणेकर. पुणेरी संस्कृतीचे बाळकडू लहानपणीच मिळालेले. त्यामुळे पुणेरी मराठी संस्कृतीचा जाज्वलस अभिमान. शालेय शिक्षण, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे. महाविद्यालयीन शिक्षण, गरवारे कॉमर्समधून बी.कॉम व बी.एम.सी.कॉलेजमधून एम.कॉम.(१९७७).

घराण्याचा पारंपारिक भांडी कारखानदारीचा व्यवसाय परंतु प्रथमपासूनच वेगळा व्यवसाय करण्याची आवड. सुरुवातीला काही कंपन्यांतून मार्केटिंगमध्ये काम केले. त्यानिमित्ताने भारतभर भ्रमण झाले.

स्क्रीन प्रिंटींगमध्ये विशेष कौशल्याची कामे केली. त्यानंतर वेगळ्या क्षेत्रात प्रवेश.

सोन्या-चांदीचे वाढते भाव, बदलत्या आवडीनिवडी, भेट वस्तूंची नाविन्यता यांचा विचार करताना सोन्या-चांदीच्या ‘परिस स्पर्शा’ची संकल्पना मनात रुजली. खास कारागिरांकडून तांबा-पितळेच्या कलात्मक वस्तू व दागिने बनवून त्यावर चांदी/सोन्याचा टिकाऊ मुलामा (Electro plating) देण्यात आला. अशाप्रकारे ‘सिल्वर लाईन एंटरप्राइजेस’ चा जन्म झाला. पुण्यात नारायण पेठेत दालन सुरु केले. पुणेकरांच्या पसंतीची पावती मिळाली. त्यानंतर नागपूर, ठाणे, रत्नागिरी, अकोला, अमरावती, गोवा, रायपूर सारख्या अनेक शहरांमध्ये प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तम प्रतिसाद मिळाला. या सर्व वाटचालीमध्ये पत्नी सौ.नूतन हिचा सक्रिय सहभाग होता.

मराठी साहित्य व कला यांची दोघांनाही मुळातच आवड असल्यामुळे अजूनही काही वेगळे करावे वाटत होते. मराठी साहित्य म्हणजे अमर्याद सागर आहे. त्यात अनेकविध साहित्यरत्ने दडलेली आहेत. परंतु तरुणांचा त्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन अधिक विकसित करण्यासाठी या तरुणांना काहीतरी नवीन मिळाले तर… या विचाराने प्रेरित होऊन मराठी कॅलिग्राफी (सुलेखन) टी-शर्टच्या क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला मुंबईच्या एका कंपनीच्या कॅलिग्राफी टी-शर्टच्या वितरणाचे (Distributorship) काम केले. परंतु थोड्याच दिवसात स्वतःच्या “सिल्वर लाईन कॅलिग्राफी टी-शर्टस्” चे उत्पादन सुरु केले आणि एक कलात्मक प्रवास सुरु झाला.

सुप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव तसेच पुण्यातील काही कलाकारांचीही मोलाची साथ लाभली आणि ‘सिल्वर लाईन’ ची घौडदौड यशस्वीपणे सुरु झाली.

पुण्यातील २०१० मधील ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी कॅलिग्राफीटी-शर्टस् ने गाजविले. या संमेलनासाठी भारताच्या विविध भागातून आलेल्या समस्त मराठी साहित्य रसिकांनी कौतुकाची थाप दिली. त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला.

पुण्यात होणाऱ्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’, ‘उत्सव’ यांसारख्या भव्य प्रदर्शनातील नियमित सहभागाने अनेक मराठी बांधवांपर्यंत पोहोचता आले.

सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे जानेवारी २०१४ मध्ये पुण्यातील ‘आचार्य अत्रे सभागृह’ येथे ‘सिल्वर लाईन’ तर्फे आयोजित करण्यात आलेले ‘कॅलिग्राफी टी-शर्ट कार्निव्हल’. या भव्य कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ.द.भि.कुलकर्णी अध्यक्षस्थानी लाभले व पुण्याचे सुप्रसिध्द मराठी व्यावसायिक श्री.डी.एस.कुलकर्णी यांनी उद्घाटन केले. ‘अक्षरधारा’चे श्री. रमेश राठिवडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांच्या प्रात्यक्षिकाने (Livedemo) सर्व रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ‘सिल्वर लाईन’ च्या यशात मानाचा तुरा खोवला गेला.

पिंपरी व डोंबिवलीयेथील अखिल मराठी साहित्य संमेलनातही मराठी बांधवांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी व्यतिरिक्त इतर भाषिकांनासुध्दा आपले टी-शर्ट विशेष आवडतात. आज परदेशातील अनेक मराठी व इतर भारतीय बांधव आपल्या मुलांना, मित्रांना व नातेवाईकांना भेट देण्यासाठी ‘सिल्वर लाईन’ चे कॅलिग्राफी टी-शर्ट आवर्जून नेतात.

यापुढे केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देश-परदेशात मराठी टी-शर्ट ची चळवळ चालू करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत हे टी-शर्टस् पोहोचविण्याचे आहेत हीच साहित्य शारदेचारणी प्रार्थना.